Crop: कांदा रोपवाटिका | Topic: 1.कांदा बियाणे पेरणीपूर्वीचे नियोजन

कांदा रोपवाटिकेसाठी कशा प्रकारच्या जमिनीची निवड करावी?

कांदा रोपवाटिकेसाठी जमिनीची निवड करताना खालील गोष्टींचा विचार करावा.

✅प्रामुख्याने माती ही  गाळाची माती, काळी माती, तांबट माती, काळी-तांबट माती, मुरमाड व वाळूसार माती यापैकी आपण गाळाची माती,मुरमाड माती व वाळूसार मातीमध्ये कांदा रोपवाटिका बनवू नये. रोपवाटिकेसाठी काळी माती तांबट माती किंवा तांबट काळी मिक्स माती असणाऱ्या जमिनीची निवड करावी.
✅जमिनीमध्ये चुनखडी किंवा जास्त खडे नसावे जेणेकरून पुढे जाऊन फेरस,फॉस्फरस यांसारख्या अन्नद्रव्यांची कमतरता भासणार नाही.
✅शेतामध्ये अशी जागा निवडू नये जिथे झाडांची सावली असते. जर अशी जागा निवडली तर सावलीमध्ये रोपे सरळ वाढतात, अशी रोपे लागवडी योग्य राहत नाहीत.
✅शेतामध्ये अशी जागा निवडू नये जिथे जास्त प्रमाणात शेणखत किंवा पालापाचोळा आहे, कारण जर या ठिकाणी पेरणी केली किंवा रोपवाटिका बनवली तर या ठिकाणची रोपे जास्त प्रमाणात नायट्रोजन शोषण करतात, ज्यामुळे रोपे सरळ व  कमकुवत वाढतात.
✅जर जास्त पाणी धरून ठेवण्याची क्षमता असणाऱ्या गाळाच्या मातीत रोपवाटिका तयार केली, तर अशा जमिनीत पाणी दिल्यानंतर वाफसा लवकर येत नाही व रोपांना हवे त्या प्रमाणात अन्नद्रव्य शोषण करता येत नाही. तसेच जास्त काळ ओलावा राहिल्यामुळे अशा जमिनीत रोपांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो,ज्यामुळे रोपांची मर होणे,रोपांना पीळ पडणे यांसारख्या अडचणी मोठ्या प्रमाणावर येतात.
✅जर मुरमाड,वाळूसार मातीची निवड रोपवाटिकेसाठी केली तर, अशा जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता खूप कमी असते व अशा जमिनीत जर योग्य प्रकारे पाणी नियोजन केले नाही तर जमिनीत वाफसा राहत नाही व पांढऱ्या मुळ्यांची वाढ योग्य प्रमाणे होत नाही. तसेच पाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे अन्नद्रव्य कमतरता मोठ्या प्रमाणावर भासते व रोपांची वाढ खुंटते व विकास कमी प्रमाणामध्ये होतो. अशी लक्षणे दिसून येतात, रोपे दुपारची सुकायला लागतात.
✅जमीन अशी निवडावी जिथे पाणी साठणार नाही व जमिनीतून पाण्याचा निचरा लवकर होईल जेणेकरून जमीनस लवकर वाफसा येईल व जमिनीत हवा आणि पाण्याचे गुणोत्तर योग्य प्रमाणात राहील.अशा जमिनीत रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते व रोपे अन्नद्रव्य शोषण चांगल्या प्रकारे करतात व त्यामुळे रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो व लागवडीसाठी सुदृढ प्रकारची रोपे मिळतात.
✅तसेच जर याउलट जास्त पाणी साठणारी व कमी निचरा होणारी जमीन रोपवाटिकेसाठी निवडली तर अशा जमिनीत वाफसा लवकर येत नाही, ज्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ सुद्धा योग्य प्रमाणात होत नाही व अन्नद्रव्य उपलब्धता कमी होते व रोपांची वाढ खुंटणे,रोपे पिवळी पडणे यांसारख्या अडचणी येतात.जास्त ओलावा राहिल्यामुळे जमिनीत असणाऱ्या बुरशींचा प्रादुर्भाव रोपांवर होतो व रोपांची मर होणे,रोपांना पिळ पडणे यांसारख्या अडचणी ही रोपवाटिकेमध्ये आपणास दिसून येतात. त्यामुळे आपले आर्थिक नुकसान होत असते.
✅रोपवाटिकेसाठी अशा जमिनीची निवड करावी जिथे जास्त प्रमाणामध्ये तण येत नाही. त्यातही लव्हाळा उगवणाऱ्या किंवा घोळ असणाऱ्या जमिनी निवडून नयेत.जास्त तण असेल तर प्रमुख पिकाबरोबर म्हणजेच कांदा रोपांबरोबर तणांची स्पर्धा होईल व मुख्य पिकास अन्नद्रव्य कमतरता भासेल व रोपांची वाढ हवी तशी होणार नाही.
✅वरील सर्व मुद्द्यांचा विचार करून रोपवाटिकेसाठी योग्य प्रकारच्या जमिनीची निवड करावी जेणेकरून तुम्हाला चांगल्या गुणवत्तेची रोपे मिळतील.