Crop: कांदा रोपवाटिका | Topic: 1.कांदा बियाणे पेरणीपूर्वीचे नियोजन

कांदा रोपवाटिका तयार करताना जमिनीची मशागत कशाप्रकारे करावी?

कांदा रोपवाटिका तयार करताना जमिनीची मशागत योग्य प्रकारे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

जमिनीची मशागत खालील प्रमाणे करावी.

✅सर्वप्रथम जमिनीची खोलवर नांगरट करावी व जमीन उन्हामध्ये किमान सात दिवस तापून द्यावी, ज्यामुळे जमिनीमध्ये असणाऱ्या हानीकारक बुरशींचे बीजाणू निष्क्रिय होतील व त्यामुळे बियाणे टाकल्यानंतर बियाण्यावर कोणत्याही प्रकारच्या बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही.
✅त्यानंतर शेतामध्ये फणपाळी मारावी,फणपाळी मारल्यामुळे शेतामध्ये असणारी मोठी ढेकळे फुटली जातील. त्याचबरोबर जो काही काडी कचरा,जुन्या पिकांचे अवशेष,तणांचे अवशेष आहेत ते वर येतील ते वर आलेले अवशेष शेताच्या बाहेर गोळा करून फेकून द्यावेत, जेणेकरून त्या अवशेषांबरोबर किडींचे कोष व बुरशीचे बिजाणू शेताच्या बाहेर जातील व बियाणे पेरणीनंतर कोणत्याही प्रकारच्या किडीचा व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही.
✅त्यानंतर शेतामध्ये रोटावेअर मारावा ज्यामुळे मातीचे लहान कण होतील.
✅त्यानंतर गादीवाफे किंवा सारे सोडून घ्यावेत व त्यावर तुम्ही बियाणे फेकून देऊ शकता (विस्कटणे),पेरणी यंत्राने पेरू शकता किंवा टोकन पद्धतीचा अवलंब करू शकता.
✅अशाप्रकारे रोपवाटिका जिथे बनवायची आहे त्या जमिनीची मशागत करायला हवी जेणेकरून चांगल्या प्रकारची दर्जेदार रोपे तयार होतील.