रासायनिक किटकनाशकांवर अवलंबून न राहता शेतकरी त्यांच्या पिकातील किड आणि रोग प्रभावीपणे कसे नियंत्रित किंवा व्यवस्थापित करू शकतात.

May 31, 2024

रासायनिक किटकनाशकांवर अवलंबून न राहता खालील पद्धतींचा वापर करून शेतकरी त्यांच्या पिकातील किडींवर नियंत्रण मिळवू शकतात.

सेंद्रिय शेती 

सेंद्रिय शेतीत रासायनिक किटकनाशकांचा वापर टाळला जातो. त्याऐवजी नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करून किड आणि रोग नियंत्रित केले जातात.

खालील नैसर्गिक उत्पादनांचा वापर

  • गोमूत्र – किड आणि रोग नियंत्रित करण्यासाठी उपयोगी, यामुळे पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
  • नीम अर्क – सेंद्रिय किटकनाशक म्हणून वापरले जाते.
  • तुळशी अर्क – नैसर्गिक अँटीबायोटिक असल्यामुळे किड आणि बुरशीवर नियंत्रण मिळते.
  • कंपोस्ट खत – घरगुती आणि शेतातील जैविक कचऱ्यापासून तयार केले जाते, जे मातीला सुपीक बनवते.

अशाप्रकारे सेंद्रिय शेतीमुळे शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदे मिळतात. आणि पिकांतील किड आणि रोगांवर नियंत्रण मिळते.

आंतरपीक पद्धती 

आंतरपीक पद्धती ही एक शेतीतील पद्धत आहे.ज्यात विविध प्रकारची पिके एका क्षेत्रात किंवा शेतात एकत्र लावली जातात.या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतात.आंतरपीक पद्धतीमुळे किड एका पिकावर एकवटली जात नाही त्यामुळे किड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

आंतरपीक पद्धतीतील काही उदाहरणे

  • भात आणि डाळीचे पिक
  • मका आणि सोयाबीन
  • गहू आणि हरभरा
  • कडधान्य आणि फळभाज्या
शेतातील विविधता 

एकाच पिकाची लागवड (मोनोक्रॉपिंग ) टाळून विविध प्रकारचे पिके एकत्र लावल्यास किड आणि रोग नियंत्रित ठेवता येतात. या विविधतेमुळे किड आणि रोगांना अनुकूल वातावरण मिळत नाही.

जैविक किटकनाशकांचा वापर 

जैविक किटकनाशकांचा वापर करून कीड नियंत्रित करण्याची पद्धत पर्यावरण पूरक आणि सुरक्षित आहे.या किटकनाशकांमध्ये जैविक  घटकांचा वापर केला जातो, ज्यामुळे नैसर्गिकरित्या किड व नियंत्रण मिळते.त्याचे उदाहरण खाली दिले आहे.

बॅसिलस थुरिंजिनिसिस (BT)

  • वापर हे जिवाणू आधारित किटकनाशक आहे. जे किडींच्या अळ्यांना मारते. हे विशिष्ट प्रकारच्या किडींवर प्रभावी असते, जसे की मोहरीच्या अळ्या सुरवंट इ.
  • कार्यप्रणाली BT चे स्पोर आणि क्रिस्टल्स किडींच्या आतड्यांमध्ये प्रवेश करतात. आणि तिथे विषारी पदार्थ सोडतात. ज्यामुळे किडींचे आतडे फुटते आणि किडी मरण पावतात.
सेंद्रिय किटकनाशकांचा वापर

सेंद्रिय किटकनाशकांचा वापर करून कीड नियंत्रित करण्याची पद्धत पर्यावरण पूरक आणि सुरक्षित आहे. या किटकनाशकांमध्ये नैसर्गिक घटकांचा वापर केला जातो ज्यामुळे नैसर्गिकरित्या किड व नियंत्रण मिळते.त्याची काही उदाहरणे खाली दिली आहेत.

1)नीम अर्क

  • वापर -हा अर्क कडू लिंबाच्या  बिया आणि पानांपासून तयार केलेला अर्क अनेक प्रकारच्या किडींवर प्रभावी आहे. जसे की पांढरी माशी, तुडतुडे, वाळवी, इ.
  • कार्यप्रणाली – निमअर्क किटकांच्या हार्मोन्स मध्ये अडथळा निर्माण करतो. ज्यामुळे किडींची वाढ आणि विकास थांबतो.

2)तुळशी अर्क 

  • वापर-तुळशीच्या पानांपासून तयार केलेला अर्क बुरशीजन्य रोग आणि काही प्रकारच्या किडींवर प्रभावी आहे.
  • कार्यप्रणाली – तुळशी अर्कात अँटिबायोटिक गुणधर्म असतात, जे बुरशी आणि किडींचा प्रादुर्भाव रोखतात.

3)लसूण तिखट अर्क

  • वापर – लसूण आणि तिखट यांच्या मिश्रणातून तयार केलेला अर्क विविध किटकांवर प्रभावी आहे. जसे की मावा, तुडतुडे, किडे इत्यादी.
  • कार्यप्रणाली-या अर्काचा गंध आणि किटकांना अप्रिय वाटतात, ज्यामुळे किटक पिकांपासून दूर राहतात.

4)तंबाखूचा अर्क

  • वापर– तंबाखूच्या पानांपासून तयार केलेल्या अर्क किटकनाशक म्हणून वापरला जातो.
  • कार्यप्रणाली– तंबाखूत असलेल्या निकोटीनमुळे किडींचे तांत्रिक तंत्र बिघडते आणि त्यांची मरततुकडी होते.
किडनियंत्रक कीटकांचा वापर 

नैसर्गिक शत्रू किटकांचा वापर करून किड नियंत्रित करता येते.उदा. लेडीबर्ड बीटल्स हे कोळी आणि इतर किड खाऊन टाकतात.

फेरोमोन सापळे 

फेरोमोन सापळे वापरून किडींना आकर्षित करून पकडले जाते. त्यामुळे किडींची संख्या कमी होते आणि त्यांच्या प्रजननावर नियंत्रण ठेवता येते.

वापसा आणि आच्छादन 

वापसा आणि अच्छादन पद्धतीचा वापर करून मातीतील आद्रता राखली जाते ज्यामुळे तणांचे प्रमाण कमी होते, या तणांच्या आच्छादनामुळे किड नियंत्रित राहतात.

पीक फेरपालट  

पिकांची फेरपालट करून किड आणि रोगांची संख्या कमी केली जाऊ शकते.एकाच प्रकारचे पीक वारंवार न लावता विविध पिकांची फेरपालट केल्यास जमिनीतील पोषक तत्वांची संतुलित पूरकता होते,आणि किड नियंत्रित ठेवली जाते.

स्वच्छता आणि निगा 

शेतातील स्वच्छता  आणि  योग्य निगा राखल्यास किड आणि रोगांची संख्या कमी  होते.शेतातील कचरा, रोगट पिकांचे अवशेष यांचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

पाणी व्यवस्थापन 

पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यास किड आणि रोगांची संख्या कमी होते. उदा. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास पानांवर पाणी साचत नाही, आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

वरील पद्धतीचा वापर करून  शेतकरी रासायनिक किटकनाशकांचा वापर कमी करून पर्यावरणपूरक शेती करू शकतात,आणि त्यांचे उत्पादन सुरक्षित आणि निरोगी ठेवू शकतात.