माती परीक्षण कसे करावे? का करावे? व माती परीक्षण केल्याचे फायदे काय?

May 5, 2023

शेतकरी हा वर्षानुवर्ष पारंपारिक शेती करतोय, शेतीमध्ये कष्ट करतोय, शेतीमध्ये राबतोय, त्यामध्ये पैसा खर्च करतोय परंतु त्यामधून निघणारे उत्पन्न निश्चितच समाधानकारक नाही हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे.शेतकरी जेवढा खर्च फवारण्यासाठी करतो,बियाण्यांसाठी करतो तेवढे उत्पन्न निघत नसेल तर निश्चितच शेतकऱ्यांनी शेतात काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे. आपल्या पिकाच्या वाढीसाठी जेवढी पाण्याची आवश्यकता असते तेवढीच मातीची सुद्धा आवश्यकता असते.  आपण जर एखादे पिक शेतामध्ये घेत असेल तर आपल्याला माती परीक्षण करणे खूपच गरजेचे आहे. आपण शेतामध्ये घेत असलेल्या पिकासाठी आपली जमीन योग्य आहे का हे माहिती असणे गरजेचे आहे. शेतामधील मातीचे आरोग्य चांगले असेल तर त्या मातीमधून चांगले उत्पन्न निघते, याउलट जर शेतामधील मातीचे आरोग्य चांगले नसेल तर शेतकरी अशा मातीमधून समाधानकारक उत्पन्न घेऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या मातीमध्ये पिकाच्या वाढीसाठी आवश्यक्य असलेले कोणकोणते घटक किती प्रमाणात उपलब्ध आहेत याची पडताळणी करणे आता काळाची गरज बनली आहे. त्यामुळे ह्या सर्व प्रश्नांवरती एकच उपाय आहे, तो म्हणजे आपल्या मातीचे माती परीक्षण करून घेणे.

माती परीक्षण म्हणजे काय ..?

माती परीक्षण म्हणजे शेतजमिनीतील अंगभूत रसायने वा जैविकांचे विश्लेषण होय किंवा माती परीक्षण म्हणजे पिकाच्या वाढीसाठी आवश्यक्य असलेला घटकांची मात्रा जमिनीमध्ये किती प्रमाणात आहे हे रासायनिक पद्धतीने प्रयोगशाळेमध्ये तपासून घेणे. याद्वारे शेतात कोणकोणते पिके घ्यावी हे नक्की करता येते व कमी खर्चात उत्पादन वाढ होते.

माती परीक्षण करण्यासाठी मातीचा एक विशिष्ट पद्धतीने नमुना गोळा करावा लागतो व तो प्रयोग शाळेमध्ये तपासून घ्यावा लागतो.मातीचा नमुना वर्षातून केव्हाही आवश्यक असेल तेव्हा घेता येतो. परंतु शक्यतो रब्बी पिकांची काढणीनंतर किंवा उन्हाळ्यात घेतल्यास पृथ:करण करून परीक्षण अहवाल पेरणीपर्यंत उपलब्ध होतो.माती परीक्षणाचा नमुना हा पिकाच्या काढणीनंतरच्या काही वेळेस जमिनी कोरड्या असताना घ्यावा. जमिनीवर पीक उभे असताना मातीचा नमुना घ्यावयाचा असेल तर, खते दिल्यानंतर दोन महिन्यांनी मातीचा नमुना पिकाच्या दोन ओळींमधून घ्यावा.कोणत्याही परिस्थितीत पिकांना दिलेल्या खताच्या मात्रेनंतर लगेचच मातीचा नमुना घेऊ नये.

मातीचा नमुना कुठून गोळा करू नये?

माती परीक्षणासाठी नमुना गोळा करत असताना तो नमुना झाडाच्या सावलीतला घेऊ नये, पाठाच्या शेजारचा घेऊ नये,बांधाच्या शेजारचा घेऊ नये, ज्या ठिकाणी आपली जनावरे बांधलेली असतात त्या ठिकाणचा सुद्धा मातीचा नमुना घेऊ नये, जेथे जमिनी ओली असते त्या ठिकाणचा सुद्धा मातीचा नमुना माती परीक्षणासाठी घेणे टाळावे.

मातीचा नमुना घेण्याची योग्य पद्धत.

  • प्रथम शेतात फेरफटका मारून शेताचे निरीक्षण करावे. जमिनीच्या मगदूराप्रमाणे पिकांचा रंग, वाढ भिन्नभिन्न असते .तसेच जमिनीच्या पृष्ठभागावरचा रंग देखील वेगवेगळ्या असतो.उतारावरील जमीन भुरकट रंगाची असते. सखलभागातील काळी असते. म्हणूनच उतार, रंग, पोत ,खोली, व्यवस्थापन व पीक पद्धतीनुसार विभागणी करावी.प्रत्येक विभागातून वेगवेगळ्या स्वतंत्ररित्या मातीचा नमुना घ्यावा.
  • एकसारख्या जमिनीतून माती परीक्षणासाठी मातीचा नमुना घेत असताना काडी, कचरा ,गवत,पिकांची धसकटे व मुळे तसेच जुन्या पिकांचे अवशेष हे शेताच्या बाहेर काढून टाकावे.       
  • जिथे पिकांची ओळीत पेरणी केली असेल अशा ठिकाणी दोन ओळींमधून नमुना घ्यावा. 
  • नुकतेच खते टाकलेल्या जमिनी,खोलगट भाग,पाणथळ जागा, झाडाखालील जमीन, बांधाजवळील जागा, शेणखताच्या ढिगार्‍याजवळील जागा, शेतातील बांधकामा जवळचा परिसर,कंपोस्ट खतांच्या जवळपासची जागा ,अशा ठिकाणातून मातीचा नमुना घेऊ नये.
  • सपाट पृष्ठभाग असलेल्या जमिनीवर 30/45 cm इंग्रजी V आकाराचा चौकोनी खड्डा करून आतील माती बाहेर काढून टाकावी.खड्ड्यांच्या दोन्ही बाजूस 2 सेंटीमीटर जाडीची माती खुरप्याच्या सहाय्याने वर पासून खालपर्यंत खरडून हातावर काढावी आणि प्लास्टिकच्या बादली टाकावी .अशा रीतीने एका भागातून दहा नमुने घेऊन त्याच बादली टाकावेत.
  • फळबागेसाठी मातीचा नमुना वेगवेगळ्या थरामधून घ्यावा .उदाहरणार्थ खड्डा खोदून पहिल्या एक फुटातील 30 सेंटिमीटर पर्यंत मुरूम नसल्यास 30-60 सेंटीमीटर थरातील दुसरा थर व खोल जमिनीतील 60 ते 90 सेंटीमीटर पर्यंत खोलीतील 3 थरातील मातीचे नमुने स्वतंत्र घ्यावेत व प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून द्यावेत.
  • ही सर्व माती एका स्वच्छ प्लास्टिकच्या कागदावर टाकावी व चांगली मिसळून घ्यावी .माती जर ओली असेल तर ती सावलीमध्ये वाळवून घ्यावी ,नंतर ह्या ढिगाचे चार समान भाग करावे आणि समोरासमोरील दोन भाग काढून टाकावे .उरलेले दोन भाग एकत्रित मिसळावेत व पुन्हा चार भाग करावेत ही प्रक्रिया एक किलो माती शिल्लक राहीपर्यंत करावी.
  • उरलेली अंदाजे एक किलो माती स्वच्छ पिशवीत भरावी.पिशवीत माहितीपत्रक टाकावे व एक लेबल पिशवीला बांधावे.                
  • शक्य तितक्या लवकर नमुने प्रयोगशाळेत पाठवावेत. सर्वसाधारणपणे नमुना गोळा करणे व प्रयोगशाळेत पाठवणे ह्यात दोन आठवड्यापेक्षा अधिक काळ नसावा, अन्यथा माती पृथ:करण बदलण्याची शक्यता असते.
  • जमीन क्षारयुक्त व क्षारयुक्त चोपण असल्यास पृष्ठभागावरील दोन सेंटीमीटर मधील क्षार बाजूस करून नंतरच मातीचा नमुना घ्यावा.
  • सूक्ष्म अन्नद्रव्यांची तपासणी करायची असल्यास लाकडी खुंटी अवजाराने मातीचा नमुना घ्यावा .कोणत्याही परिस्थितीत लोखंडी अवजारे उपकरणे माती नमुने घेण्यासाठी वापरू नका. नमुना स्वच्छ पिशवीत भरावा .सूक्ष्म अन्नद्रव्यांसाठी माती नमुना घेताना जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. पिशवीवर सूक्ष्म अन्नद्रव्ये तपासणीसाठी नमुना अशी नोंद करावी.

मातीचा नमुना कोठे व कसा पाठवावा?

मातीचा नमुना घेतल्यानंतर खालील माहिती लिहून ती मातीचा नमुना असलेल्या पिशवीत टाकावी .मातीचा नमुना लवकरात लवकर माती परीक्षण करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवावा

  1. शेतकऱ्याचे नाव 
  2. पूर्ण पत्ता
  3. गट नंबर स.न
  4. बागायत /कोरडवाहू
  5. ओलिताचे साधन 
  6. जमिनीचा निचरा.
  7. जमिनीचा प्रकार 
  8. जमिनीची खोली
  9. जमिनीचा उतार
  10. नमुना घेतल्याची तारीख
  11. मागील हंगामात घेतलेले पीक व त्याचे उत्पादन वापरलेली खते व त्यांचे प्रमाण
  12. पुढील हंगामात घ्यावयाची पिके त्यांची जात व अपेक्षित उत्पादन.

माती परीक्षणाचे महत्त्व.Plant Nutrients Blog Thumbnail Image

  • माती परीक्षण केल्यामुळे मातीमधील सामुचे प्रमाण कळते,मातीमधील क्षारतेचे प्रमाण समजते ,तसेच मातीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण किती आहे ते कळते. त्याचबरोबर पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांपैकी मातीतील नत्र ,स्फुरद, पाला यांचे प्रमाण मातीमध्ये किती आहे ते समजते .तसेच मॅग्नेशियम, कॅल्शियम ,लोह ,कॉपर ,बोरॉन ,
  • सल्फर, झिंक, इत्यादी अन्नद्रव्यांचे प्रमाण मातीमध्ये किती आहे ते समजते .माती परीक्षण केल्यामुळे रासायनिक खतांचा संतुलित वापर करता येतो. त्यामुळे उत्पादनात वाढ होऊन खतांच्या खर्चात बचत होते.
  • माती परीक्षण केल्यामुळे आपल्याला आपल्या जमिनीतील सामुचे
  • त्याचबरोबर माती परीक्षण केल्यामुळे मातीतील चुनखडीचे प्रमाण किती आहे ते समजते. चुनखडीचे प्रमाण हे तीन ते पाच टक्के पर्यंत असेल तर ते अत्यंत चांगले समजले जाते जर मातीमध्ये मुक्त चूनखडीचे प्रमाण 14% पेक्षा जास्त असेल तर ती माती पिकांना अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात करू शकत नाही .त्यामुळे मातीमध्ये चुनखडीचे प्रमाण योग्य प्रमाणात असणे हे अत्यंत गरजेचे आहे.
  •  प्रमाण किती आहे ते समजते. मातीच्या सामूचा पिकाच्या वाढीसाठी उपयोग होतो. मातीचा सामू पिके अन्नद्रव्य किती प्रमाणात शोषून घेतात ते दर्शवितो .मातीचा सामू जर 6.7 ते 7.7 च्या दरम्यान असेल तर तो उत्तम समजला जातो. मातीचा सामु हा 6.5 पेक्षा कमी असेल तर त्याला उदासीन करण्यासाठी त्यामध्ये चुना मिसळला जातो व मातीमध्ये सामोचे प्रमाण 7.5 पेक्षा जास्त असेल तर त्यामध्ये जिप्सम मिसळावा. 
  • त्यानंतर माती परीक्षण केल्यामुळे जमिनीतील क्षारतेचे प्रमाण समजते. जमिनीची क्षारता ही मातीमध्ये विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण किती आहे ते दर्शवते.जमिनीची क्षारता ही एक पेक्षा कमी असेल तर ती उत्तम समजली जाते .जर मातीची क्षारता एक पेक्षा जास्त असेल तर पिकांची वाढ ही कमी झालेली दिसून येते. 
  • माती परीक्षण केल्यामुळे मातीमधील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण किती आहे ते समजते .जमिनीची सुपीकता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने सेंद्रिय कर्ब हे उत्तम योगदान देते. जर जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा 0.50% पेक्षा कमी असेल तर त्या मातीला निरोगी समजले जात नाही. 
  • जमीनीतील माती नमुन्याचे प्रामुख्याने रासायनिक पृथ:करण करून त्यातील उपलब्ध मुख्य (नत्र,स्फुरद,पालाश) दुय्यम (कॅल्शियम, मॅग्नेशियम व गंधक) व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे (लोह,जस्त, मंगल, तांबे,बोरॉन,मॉलिब्डेनम इत्यादी) प्रमाण तपासणी होय. आवश्यक असल्यास जमिनीची भौतिक व रासायनिक गुणधर्माची तपासणी सुद्धा केली जाते.

  • माती परीक्षण केल्यामुळे रासायनिक खतांचा संतुलित वापर करता येतो ,ज्यामुळे उत्पादनात वाढ होऊन खतांचा खर्चात बचत होते. माती परीक्षण केल्यामुळे जमिनीचे आरोग्य योग्य राखण्याच्या शिफारशीचा अवलंब केल्यास पिकांची योग्य वाढ होते व पिकांवर कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी होऊन त्या वरील खर्चात बचत होते

.