टोमॅटो शेती टिप्स : योग्य टोमॅटो रोपांची निवड कशी करावी ?

April 19, 2024

  ”टोमॅटो रोपांची निवड टोमॅटो उत्पादन वाढीच्या दृष्टीने टोमॅटो रोपांची निवड हा महत्त्वाचा मुद्दा आहे.  टोमॅटो रोपांची निवड करताना काही निरीक्षणे करणे व जिथून रोपांची खरेदी करणार आहे त्या नर्सरी मधून काही माहिती घेणे गरजेचे आहे.”

किती दिवसांच्या टोमॅटो रोपांची निवड करावी…?

टोमॅटो रोपांची निवड करताना किती दिवसांच्या टोमॅटो रोपांची निवड करावी हे हंगामावर, त्या वेळच्या नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून आहे. उन्हाळी व पावसाळी हंगामात जर्मिनेशन चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे या हंगामात शक्यतो 21 ते 25 दिवसांच्या रोपांची निवड ही लागवडीसाठी करावी. त्या उलट हिवाळी हंगामात जर्मिनेशन होण्यासाठी उन्हाळी व पावसाळी हंगामाच्या तुलनेत जास्त कालावधी लागतो त्यामुळे हिवाळी हंगामामध्ये 25 ते 35 दिवसांच्या दरम्यानची रोपे लागवडीसाठी वापरावी.

त्याउलट जर तुम्ही उन्हाळी व पावसाळी हंगामात 25  दिवसांपेक्षा जास्त व हिवाळी हंगामात 30 दिवसांपेक्षा जास्त कालावधीची रोपे लागवडीसाठी वापरली तर, अशा रोपांच्या मुळांची  कॉईल तयार झालेली असते व अशी रोपे जर तुम्ही लागवडीसाठी वापरली तर अशी रोपे रोप रुजण्याच्या अवस्थेमध्ये चांगल्या प्रकारे सेट होतात. परंतु; जेव्हा रोपांची फुलअवस्थ सुरू होते तेव्हा मुळांची कॉईल झाल्यामुळे योग्य प्रमाणात जमिनीमधून अन्नद्रव्ये शोषण करत नाही. त्यामुळे रोपे सुकण्यास सुरुवात होतात. याउलट जर आपण उन्हाळी व पावसाळी हंगामात 21 दिवसांपेक्षा कमी व हिवाळी वातावरणात 25 दिवसांपेक्षा कमी कालावधीची रोपे लागवडीसाठी वापरल्यास रोपे कोवळी असल्यामुळे अशी रोपे रोप रुजण्याच्या अवस्थेत पीथियम रोग मर या बुरशीजन्य रोगास बळी पडतात व रोप मर मोठ्या प्रमाणामध्ये होते. वरील अडचणी येऊ नयेत म्हणून आपण योग्य दिवसांची रोपे  हंगामानुसार योग्य लागवडीसाठी वापरावीत.

कितीच्या ट्रेमध्ये रोपे लागवडीसाठी वापरावी..?

मार्केटमध्ये 70 व 100 च्या ट्रेमध्ये टोमॅटो रोपे विक्रीसाठी उपलब्ध असतात. सत्तरच्या ट्रे मधील रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ चांगली झालेली असते, कारण 70 च्या ट्रेमध्ये मुळांची वाढ होण्यासाठी जास्त जागा असते. त्या उलट 100 च्या ट्रे मधील रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ ही कमी जागेत जास्त झालेली असते. त्यामुळे मुळांची कॉइल तयार होते तसेच सत्तरच्या ट्रे मधील रोपांचे खोड हे जाड असते. त्या तुलनेत 100 च्या ट्रे मधील रोपांचे खोड हे कमी जाड असते. सत्तरच्या ट्रे मधील रोपांची शंभरच्या ट्रे मधील रोपांच्या तुलनेत चांगली वाढ झालेली असते.

सत्तरच्या ट्रे मधील रोपांची पाने ही 100 च्या ट्रेमध्ये रोपांच्या तुलनेत जाड,पसरट, हिरवीगार असतात. वरील सर्व मुद्द्यांचा विचार केला असता लागवडीसाठी शक्यतो सत्तरच्या ट्रेमधील रोपांची निवड करावी.

टोमॅटो रोपांची उंची किती असावी ..?

लागवडी योग्य टोमॅटो रोपांची उंचीही दहा ते बारा सेंटीमीटर इतकी असावी. यापेक्षा कमी उंचीची रोपे लागवडीसाठी वापरू नयेत. जर यापेक्षा कमी उंचीची रोपे लागवडीसाठी वापरली तर जेव्हा आपण अशी रोपे मल्चिंग पेपर वर लागवड करतो तेव्हा, दिवसा उन्हाची जी गरम वाफ मल्चिंग मध्ये तयार होते ती थेट मल्चिंगच्या होल मधून रोपांवरती येते व त्यामुळे कमी उंचीच्या रोपांची सर्व पाने जळून जातात. त्या उलट दहा ते बारा सेंटीमीटर ची रोपे मल्चिंग मध्ये लागवड केली तर अशा रोपांवर जरी मल्चिंग मधील गरम वाफ आली तरी अशा रोपांची फक्त खालील पाने जळतात. वरील सर्व कारणांचा विचार केला असता लागवडीसाठी दहा ते बारा सेंटीमीटर इतक्या उंचीच्या रोपांची निवड आपण करावी.

सुदृढ टोमॅटो रोपांसाठी कोणत्या गोष्टींचे निरीक्षण करावे..?

टोमॅटो रोपांच्या खोडाचा रंग हा फिकट जांभळा असावा. खोडाचा जांभळा रंग हा टोमॅटो रोपे मॅच्युअर आहेत का हे दर्शवते. टोमॅटो रोपांची पाने ही हिरवीगार, पसरट  व तेलकट असावी. अशीच पाने असणाऱ्या रोपांची निवड करावी. टोमॅटो रोपांवर सरकोसपोरा काळे ठिपके, लवकर येणारा करपा, जिवाणूजन्य काळे ठिपके, पिथियम रोप मर यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे का ते पाहावे व निरोगी रोपांची लागवडीसाठी निवड करावी. टोमॅटो रोपांवर रसशोषक किडीचा, टूटानाग अळी  यांसारखे किडींचा प्रादुर्भाव झाला आहे का ते पाहावे व कीडमुक्त रोपांची निवड लागवडीसाठी करावी.

टोमॅटो रोपे खरेदी करताना जिथून रोपे घेणार आहोत तिथून खालील माहिती नक्की घ्या..?

टोमॅटो रोपांवर बी टोकन पासून आत्तापर्यंत कोणकोणत्या बुरशीनाशकांची, कीटकनाशकांची फवारणी व आळवणी केली आहे याची माहिती घ्या. रोपांना आत्तापर्यंत कोणकोणत्या पोषक उत्पादनांचा व अन्नद्रव्यांचा पुरवठा केला आहे याची माहिती घ्यावी. या सर्व माहितीच्या आधारे आपणास पहिल्या पंधरा दिवसांमधील फवारणी व अळवणी नियोजन करता येते.

टोमॅटो रोपे खरेदी करताना रोपे किती दिवस पॉलिहाऊस मध्ये, नेट हाऊस मध्ये व बाहेरील वातावरणात हार्डनिंग साठी ठेवली आहेत याची संपूर्ण माहिती घ्यावी. रोपे चांगल्या प्रकारे हार्डनिंग केली असती तर, रोपांची वातावरणातील नैसर्गिक घटकांविरुद्ध प्रतिकार शक्ती चांगली असते व अशी रोपे लवकर सेट होतात.

  • रोपांची निवड करताना नर्सरीची निवड करणे गरजेचे आहे त्यासाठी खालील पॅरामीटर्स मध्ये ती नर्सरी बसत आहे का ते पाहावे..
  • नर्सरी ही मोकळ्या वातावरणात असावी. शेजारी कोणतेही दुसरे पीक नसावे. जर शेजारी दुसरे कोणते पीक असेल तर, त्या पिकावरील किडींचा व विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव नर्सरी मधील रोपांवर होण्याची शक्यता असते.
  • नर्सरीच्या जागेच्या चारही बाजूने पाच फुटी insect net लावलेले असावेत ज्यामुळे बाहेरून येणाऱ्या किडींवरती अटका होतो व आपली हार्डनिंग साठी ठेवलेल्या रोपांवर या किडीचा प्रादुर्भाव होत नाही.
  • नर्सरीमध्ये पॉलिहाऊस, नेट हाऊस व हार्डनिंगची जागा असे तीन टप्पे असावेत. पहिल्या टप्यात पॉलिहाऊस मध्ये बियांची उगवण क्षमता वाढते. दुसऱ्या टप्प्यात नेट हाऊस मध्ये रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होते व तिसऱ्या टप्यात हार्डनिंगच्या जागेत रोपे हार्डिंग केल्यामुळे रोपांची प्रतिकारशक्ती वाढते.
  • पॉलिहाऊस वर नेट हाऊसला चांगल्या प्रकारचे इन्सेक्ट नीट लावलेले असावे. जेणेकरून बाहेरील किडी आत मध्ये येणार नाही.
  • नर्सरीचे दरवाजे चांगल्या प्रकारचे असावे व त्यालाही insect net  लावलेले असावे.

वरील सर्व गोष्टींची पूर्तता केलेल्या नर्सरीची निवड रोपे लागवडीसाठी करावी.

टोमॅटो रोपे लावताना कोणती काळजी घ्यावी..?
  • टोमॅटो रोपे लावण्यापूर्वी खालील प्रमाणे शेतात पाण्याचे नियोजन करावे.
  • शेतात रोप लागवड करण्यापूर्वी दोन दिवस ठिबक द्वारे भरपूर पाणी द्यावे व त्यानंतर शेत वापस्यावर आल्यावर रोपांची लागवड करावी.
  • जास्त कोरड्या मातीत किंवा जास्त ओल्या मातीत रोपांची लागवड करणे टाळावे.
  • जास्त ओल्या मातीत जर आपण रोपे लावली तर मजुरांच्या हाताला चिखल लागतो व त्यामुळे रोपांची लागवड व्यवस्थित करता येत नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात रोपांची मर होऊ शकते.
  • जर कोरड्या मातित रोपांची लागवड केली तर रोपे सुकून जातात.
  • वरील सर्व  गोष्टींचा विचार करून नर्सरी मधून योग्य टोमॅटो रोपांची निवड करावी.